मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. वरळीतल्या सुखदा इमारतीतून बाहेर पडत असताना गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे.
अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव यापूर्वी कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी इथल्या सुखदा इमारत इथं आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परिसरातच सी-लिंक जवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चतुर्वेदी यांच्यासह देशमुखांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
याआधी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. पण एकदाही अऩिल देशमुख चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.