Top Newsराजकारण

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत ३ दिवस वाढ

ऋषिकेश देशमुखांच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसाने वाढला आहे. त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमएलए सत्र न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ६ तारखेला त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांच्या कोठडीत १२ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. देशमुख ईडीला सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद सिंग यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख यांना तीन दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे.

ऋषिकेश देशमुखांच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी तहकूब

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना आज देखील दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रिंगच समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुख कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी गेले होते. मात्र, अद्याप ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. देशमुख यांच्या जामीन अर्जावर आता २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. हृषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. हृषिकेश यांनी शुक्रवारी ईडीपुढे चौकशीस हजर राहणे टाळले. अनिल देशमुख यांना संशयित म्हणण्यात आले आणि १२ तास चौकशी केल्यानंतर आरोपी म्हणून अटक करण्यात आले. तसेच आपल्याबाबत होईल, अशी भीती त्यांनी जामीन अर्जात व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button