अनिल देशमुखांच्या दोन्ही सहाय्यकांच्या ईडी कोठडीत २० जुलैपर्यंत वाढ
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही आरोपींना आणखी १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पालांडे आणि शिंदे आता २० जुलैपर्यंत अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असतील.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित १०० कोटींच्या वसुली आदेशाच्या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरु आहे. याच प्रकरणात देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे, असा दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे. ईडीने संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना २५ जूनला ताब्यात घेतलं होतं. दोघं जण ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नव्हते. त्यामुळे अखेर त्याच दिवशी रात्री ईडीने दोघांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर ईडीने दोघांना न्यायालयात हजर केलं.
ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक हे देखील दोषी असल्याचे आढळले आहे. जो पैशांचा गैरव्यवहार केला जायचा त्यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा महत्त्वाचा रोल होता, अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे. देशमुख यांचा पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे हा व्यवहार निश्चित करायचा तर दुसरा पीए कुंदन शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. दोघं स्वीय साहाय्यकांची सध्या चौकशी सुरु आहे. पण ईडी आता देशमुखांची पुन्हा चौकशी करणार आहे.