राजकारण

राजीव सातव यांच्या रूपाने चांगला सहकारी आणि मित्र गमावला : राहुल गांधी

मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा चेहरा दिवंगत राजीव सातव यांच्या निधनानंतर आज ऑनलाईन श्रद्धांजली संभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह देशातील आणि राज्यातील काँग्रेसचे बडे नेते सहभागी झाले. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत’, अशा काही आठवणी राहुल गांधी यांनी यावेळी सांगितल्या.

परिवारातील सदस्य गेल्याचे दुःख : प्रियंका गांधी

राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षात विविध पदे भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी सातव यांना श्रद्धांजली अपर्ण केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनीही राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून श्रद्धांजली

राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती. लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तीक मोठी हानी झाली, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दु:ख व्यक्त केलं.

अशोक चव्हाण म्हणाले की, राजीव सातव यांच्याबरोबर संसदेत एकत्र काम केले. पाच वर्ष त्यांनी संसदेत उत्तम काम केले. ते अभ्यासपूर्ण विषय मांडायचे, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर ते देशपातळीवर पोहचले. राजीव यांचे निधन हा एक मोठा धक्का असून पक्ष व सातव कुटुंबासाठी ही मोठी हानी आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांपैकी नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुकूल वासनिक, शिवराज पाटील चाकूरकर यांनीही सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button