
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावरुन महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केलीय. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ‘महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा’, अशा खोचक शब्दात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.