मुंबई : रझा अकदामीबद्दल जो काही तपास करायचा असेल तो पोलीस करत आहेत. परंतु भाजप नेते आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात काय करतात? त्याचा फोटो माझ्याकडे आहे. पोलीस याचा तपास करेल. अमरावतीत कुठल्याही समुदायात दंगल घडली नाही. अमरावतीत माजी मंत्र्यांकडून २ तारखेच्या रात्री प्लॅनिंग रचण्यात आलं. काही तरुणांना पैसे देऊन दंगल भडकवण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, अमरावतीत दंगल पेटवण्यासाठी दारु, पैसे वाटण्यात आले. त्यासाठी मुंबईतून पैशांचा पुरवठा करण्यात आला. ते पैसे लोकांना वाटण्यात आले. अमरावती शहरात दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. पोलीस तपासात हे उघड झालं त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजपाचं दंगलीचं हत्यार बाहेर काढते. भाजपा दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकारण खेळत आहे. महाराष्ट्राची जनता भाजपच्या या राजकारणाला कधीच स्वीकारणार नाही. अमरावतीबाहेर कुठेही हिंसाचार घडला नाही. समुदायात तेढ निर्माण करण्याचं राजकारण महाराष्ट्राच्या जमिनीवर चालणार नाही असं त्यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रात येऊन येथील सरकार उखडून टाकू असं विधान करतात. परंतु कुठलंही सरकार लोकांमुळे आणि बहुमताने निवडून येते. परंतु सरकार उखडण्याची भाजपाची पद्धत ही आहे की, आमदारांना खरेदी करण्याचं काम, प्रलोभन दिले. हा सगळा खेळ गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेशात पाहिला गेला परंतु हे महाराष्ट्रात चालणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे विरोधी नेत्यांवर दबाव टाकला जातो. पश्चिम बंगालमध्ये ज्यारितीने नेत्यांना घाबरवून भाजपात सामील करून घेतलं. पण निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा हे लोक टीएमसीत जात आहे. महाराष्ट्रातही असेच राजकारण केले. शरद पवारांना नोटीस देण्याचं काम केले. महाराष्ट्र सरकार उखडून फेकण्याचं स्वप्न भाजपानं सोडावं. महाराष्ट्राच्या सरकारचं चुंबक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेशी जोडली आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष चालणार आहे. मागील काही दिवसांपासून एनसीबी कारवाईचा भांडाफोड केला आहे. आम्हाला ईडी, सीबीआय, एनसीबी कुठल्याही यंत्रणेकडून घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही असा इशारा नवाब मलिकांनी दिला.
…तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आशिष शेलारांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर
नवाब मलिकांच्या आरोपाला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार यांनी ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पूर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही एवढं मात्र खरं. अशापद्धतीनं दरवेळी वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीचा आणि २०१६-१७ सालच्या फोटोचा काय संबंध?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
माझा त्या फोटोचा आणि रझा अकादमीच्या फोटोशी काय संबंध? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये राज्य सरकारच्या अपयशाला लपवण्याचं काम तुम्ही करू नका. तुमची खोड जर जाणार नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असा इशाराच आशिष शेलार यांनी नवाब मलिकांना दिला आहे.
शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना अटक का नाही? : नितेश राणे
राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, रझा अकादमीचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर अफवा पसरवीत असताना पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता? रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी का दिली? अशी प्रश्नांची सरबत्तीही राणेंनी केली. रझा अकादमीच्या समर्थकांनी त्रिपुरात धार्मिक स्थळांची तोडफोड झाल्याची खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवून मुस्लीम धर्मियांची माथी भडकविली. १२ नोव्हेंबर रोजी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या भिंतीपत्रकातून हिंसाचार घडविण्यासाठी चिथावले गेले. एवढे सगळे घडत असतानाही राज्याच्या पोलिसांनी रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी दिली गेली. या मोर्चात सहभागी झालेल्या मंडळींनी काही कारण नसतांना हिंदू धर्मियांवर हल्ले चढविले, पोलिसांवरही दगडफेक केली. मात्र पोलिसांनी हिंसक जमावाला बळाचा वापर करून रोखले नाही. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि महाविकास आघाडीचे काही नेते या हिंसाचाराबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना दोष देत आहेत, हे धक्कादायक आहे असा आरोप नितेश राणेंनी केला.
तसेच झालेल्या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करावी यापुढे हिंदूंवर हल्ले झाले तर त्याला योग्य पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल. अशा वेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशाराही नितेश राणेंनी दिला. २०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चात झालेला हिंसाचार, भिवंडीत या संघटनेच्या जमावाने पोलीस स्थानकावर हल्ला चढवून दोन पोलिसांची केलेली हत्या या घटनांचेही आ. राणे यांनी यावेळी आठवण करून दिली. त्याचसोबत शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी रझा अकादमीच्या व्यासपीठावर जाऊन केलेल्या भाषणाची चित्रफीत ऐकवत याबद्दल खोतकर यांना का अटक केली नाही असा सवालही आमदार राणे यांनी केला.