फोन हॅकिंग वृत्तावर अमित शाहांना वेगळाच संशय !
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पेगासस फोन टॅपिंग, हॅकिंगचा गौप्यस्फोट करण्यात आल्याने देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी, मोदी सरकारचे मंत्री आणि मोठमोठ्या पत्रकारांची नावे यामध्ये असल्याने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपाने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, गृहमंत्री अमित शाह यांना यामागे वेगळाच संशय येत आहे.
संसदेचे अधिवेशन सुरु होण्याच्या बरोबर आधी हा रिपोर्ट आला आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय शाह यांनी व्यक्त केला आहे. काही लोक देशाच्या लोकशाहीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा उद्देश भारताचा विकास थांबविणे हा आहे. मात्र, या उद्देशांना सरकार यशस्वी होऊ देणार नाही, असे शाह यांनी म्हटले आहे.
आज संसदेचे अधिवेशन सुरु झाले आहे. याचा घटनाक्रम देशाने पाहिला आहे. लोकशाहीला बदनाम करण्यासाठी अधिवेशनाच्या बरोबर आदल्या दिवशी रात्री उशिरा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अपमानीत करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करत आहेत, असा आरोप शाह यांनी केला आहे. फोन हॅकिंग माझ्या नावाशी या आधीही अनेकदा जोडण्यात आले आहे. मात्र, आज मी गंभीरतेने सांगू इच्छितो की, हा तथाकथित रिपोर्ट लीक होण्याची वेळ आणि संसदेचे अधिवेशन, याची क्रोनोलॉजी समजून घ्या, असे म्हणत शाह यांनी या टायमिंगवरच बोट ठेवले आहे.