
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला अनेक धक्के मिळत आहे. त्यातच स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक आमदार राजीनामा देत असल्याने भाजप चिंतेत आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी भाजपानं कमान गृहमंत्री अमित शाह यांच्या हाती दिली आहे. कुठल्याही प्रकारे मौर्य यांना रोखून भाजपला लागलेली गळती थांबवण्याचं आव्हान शाह यांच्यासमोर आहे.
मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भाजपचे १३ आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता. पवारांचा हा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह यांनी कंबर कसली आहे. भाजपत नाराज असलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्री दारासिंह चौहान, राज्यमंत्री धर्मसिंह सैनी, आमदार ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य, विधान परिषद आमदार देवेंद्रप्रताप सिंह हे भाजप सोडणार असल्याची बातमी आली. त्यानंतर या नेत्यांना दिल्लीहून फोन येऊ लागले. जर काही नाराजी असेल तर बसून चर्चा करुया. नेतृत्व तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. परंतु घाईगडबडीत असा कुठलाही निर्णय घेऊ नका ज्यामुळे पक्षाला आणि वैयक्तिक तुम्हाला राजकीय नुकसान होईल अशी हमी दिल्लीतून देण्यात आली आहे.
स्वामी प्रसाद यांच्यानंतर आणखी २ मंत्री, ६ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे. मंगळवारी दिवसभर चर्चा सुरु होती. परंतु अद्याप कुणी राजीनामा दिला नाही. परंतु काही काळात ते समाजवादी पक्षात सहभागी होतील असा दावा करण्यात येत आहे. मौर्य यांच्या दाव्याप्रमाणे १० ते १२ आमदार भाजपाचा राजीनामा देतील. ४ भाजप आमदार राकेश राठोड, जय चौबे, माधुरी वर्मा आणि राधाकृष्ण शर्मा हे याआधीच समाजवादी पक्षात सहभागी झाले आहेत.
अमित शाह यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना जबाबदारी दिली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांची ताकद भाजपाला चांगलीच माहिती आहे. मौर्य यांच्या राजकीय ताकदीचा फायदा भाजपला २०१७ च्या निवडणुकीत झाला होता. तेव्हा स्वामी प्रसाद मौर्य बीएसपीचे ताकदवान नेते होते. निवडणुकीच्य काळात त्यांनी बसपाची साथ सोडत भाजपत प्रवेश घेतला होता. यूपीच्या निवडणूक आखाड्यात ओबीसी समुदायाचं किती महत्त्व आहे हे सर्वच राजकीय पक्षांना माहिती आहे.
यूपीत ओबीसी समाजाची लोकसंख्या ४२ टक्के आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने १२५ ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांची राजकीय ताकद २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दाखवली होती. जेव्हा मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील सदस्य धर्मेंद्र यादव यांना हरवून मौर्य यांची मुलगी खासदार म्हणून निवडून आली. आता स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडणं पक्षासाठी निवडणुकीच्या काळात अडचणीचं ठरु शकतं.