Top Newsअर्थ-उद्योग

अंबानी कुटुंब लंडनमध्ये स्थायिक होणार नाही; रिलायन्स समूहाचे स्पष्टीकरण

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा, उद्योजक मुकेश अंबानी यांनी लंडनमध्ये आलिशान घर विकत घेतल्यानंतर ते तिथेच स्थायिक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत काही माध्यमांनी वृत्तही दिले आहे. मात्र या सर्व चर्चांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने पूर्ण विराम दिला. रिलायन्सने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबानी यांची लंडन अथवा जगात कुठेही स्थायिक होण्याची किंवा राहण्याची कोणतीही योजना नाही. तसेच, अंबानी कुटुंब बकिंगहॅमशायरच्या स्टोक पार्क परिसरात ३०० एकरच्या कंट्री क्लबला आपले मुख्य घर बनवणार असल्याचे वृत्त खोटे आणि निराधार आहे.

एका वृत्तपत्रातील बातमीत अंबानी कुटुंब लंडनच्या स्टोक पार्कमध्ये अंशतः वास्तव्य करणार असल्याचं सांगितलंय. पण ते वृत्त खोडसाळ असून, सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झालंय, असंही रिलायन्सनं दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय. रिलायन्स समूहातील आरआयआयएचएल या उपकंपनीने अलीकडेच स्टोक पार्क मालमत्ता खरेदी केलीय. ती मालमत्ता वारसा ठिकाण असून, त्या जागेवर एक प्रमुख गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट उभारण्याचा आमचा उद्देश आहे. तसेच नियोजन मार्गदर्शक तत्त्वे आणि स्थानिक नियमांचे पूर्णपणे पालन करूनच आम्ही ते विकसित करणार आहोत. यामुळे समूहाच्या वेगाने वाढणाऱ्या ग्राहक व्यवसायात भर पडेल. त्याच बरोबर ते भारताच्या प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करेल, असंही निवेदनात रिलायन्सनं म्हटलंय.

रिलायन्सने लंडनमधील ही मालमत्ता ५९२ कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, अंबानी कुटुंबीय स्टोक पार्क इस्टेटला आपले दुसरे घर बनवणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला आता रिलायन्सनेच पूर्ण विराम दिला आहे. अंबानी कुटुंब मुंबईत ४ लाख वर्ग फुटांच्या घरात राहतात. त्यांचे घर ‘अँटीलिया’ शहरातील एल्टामाउंट रोडवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button