
ठाणे : मुंबई, ठाण्यात कोरोनाचा कहर वाढल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्गही बंद राहणार आहेत, तर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरूच राहणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशावेळी मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नंतर आता मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार असल्याची भूमिका शिक्षण विभागानं घेतली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा गोल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे घेता आल्या नाहीत, यंदा मुलांचे लसीकरण करून परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत कोरोना स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.




