Top Newsराजकारण

किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयावरून आरोप-प्रत्यारोपांची राळ सुरूच !

फडणवीस सरकारने तर दारूची ऑनलाइन होम डिलिव्हरी करण्याचे धोरण आखले होते... संजय राऊतांचा निशाणा

मुंबई : वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. मात्र, या निर्णयाला विरोध करत भाजपाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. परंतू, राज्य सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करत फायदे सांगण्यात येत आहेत. यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शनिवारी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारच्या धोरणाची आठवण करून देत भाजपावर टीका केली आहे. फडणवीस सरकारने दारूची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखले होते, ते काय होते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, दारू हे औषध आहे आणि ते कमी प्रमाणात प्या, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. परंतु सर्वच दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी नाही. ज्या सुपरमार्केटचे आकारमान १ हजारपेक्षा जास्त आहे. अशा सुपरमार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईनची विक्री करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

संजय राऊत ‘झिंग झिंग झिंगाट’; पडळकरांची बोचरी टीका

राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपने टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.

जनाब संजय राऊत झिंग झिंग झिंगाट झाले आहेत. शरद पवारांच्या नावाचा वापर करून ते वाईन विक्रीचं समर्थन करतायत.जे पवारांनी आयुष्यात सोसलं आहे, त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केली आहे, त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या युवा पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.

जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत फडणवीस खुलासा करतील. त्यामुळेच संजय राऊत ‘झिंग झिंग झिंगाट’ झाले आहेत. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का, की महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार असून परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना परवानगी नसेल? असा सवाल पडळकरांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांना केला.

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावं लागले नव्हतं ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावं लागलं. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत, असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला.

नवाब मलिकांना शेती केव्हापासून कळू लागली, चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि त्यांच्याच पोरांना पाजायची, असा प्रकार महाविकास आघाडी सरकाने सुरू केला आहे. किराणा स्टोअर्स, माॅलमधील वाईन विक्रीविरोधात आम्ही राज्यभर रस्त्यावरची लढाई लढणार आहोत, शिवाय न्यायालयातही दाद मागू. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केव्हापासून शेती कळू लागली, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत लगावला.

पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेसची इतके वर्षे सत्ता होती, पण इतका भीषण निर्णय कधीच घेतला नाही. तरुण पिढी बरबाद करण्याचा हा डाव आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार असल्याचा जावईशोध आघाडी सरकारने लावला आहे. शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि त्यांच्याच पोरांना पाजायची, असा प्रकार होईल. नवाब मलिकांनी वाईन विक्रीची घोषणा केली. त्यांना शेतीतील केव्हापासून कळू लागले. कुणाच्या इंटरेस्टमुळे हा निर्णय घेतला, असा सवालही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button