आता अखिलेश यादव यांचाही ममता बॅनर्जींना पाठिंबा
लखनऊ : पश्चिम बंगालमध्ये आता विधानसभेचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांनी आक्रमक प्रचार सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेत्यांनी पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अशावेळी आता समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केलं आहे.
रायझिंग यूपी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन बोलताना अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केलं आहे. अखिलेश यादव म्हणाले की, त्यांचा पक्ष पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना समर्थन देत आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा आणि पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील, अशी घोषणाही अखिलेश यादव यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय हा समाजवादी पक्षाचा विजय असेल. पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजप आणि त्यांचे काही सहकारी पक्ष लपून आहेत. निवडणूक संपताच भाजपचे लपून बसलेले सहकारी पक्ष उत्तर प्रदेशात येतील. मात्र, आता उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवण्यास तयार आहे, असा टोलाही अखिलेश यांनी यावेळी लगावला आहे.
बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांना धक्का देणारे आणि भाजपलाही सळो की पळो करुन सोडणारे तेजस्वी यादव आता पश्चिम बंगालच्या मैदानात उतरले आहेत. 1 मार्च रोजी तेजस्वी यादव यांनी आज तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यावेळी लालूंच्या आदेशानंच आपण पश्चिम बंगालमध्ये आलो आहोत, असं तेजस्वी यांनी सांगितलं.