अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळायला हवी; चित्रा वाघ यांची मागणी

धुळे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच पक्षाने पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्येच अडकवून ठेवल्यासारखी स्थिती आहे. परंतु, अजितदादांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाच कधी काळी राष्ट्रवादीत असलेल्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचारासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या मदतीच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. अजितदादा हे प्रचंड क्षमता असलेले नेते आहेत. मी त्यांच्यासोबत काम केलेली कार्यकर्ती आहे. अडीच वर्ष शिवसेनेला आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याचं मी मध्यंतरी ऐकलं होतं. परंतु, ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे. तरीही राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला काहीच हरकत नाही, असं माझ्या सारख्या कार्यकर्तीला वाटत आहे, अशी मागणीच चित्रा वाघ यांनी केली आहे.
एवढी क्षमता असलेल्या नेत्याला केवळ पुण्यातील पिंपरी-चिंचवडपर्यंतच अडकवून टाकल्यासारखी स्थिती सध्या दिसत आहे. यामुळेच त्यांच्या पक्षातील खासदाराने पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत ही खदखद व्यक्त केली असावी. असं मला वाटतं, असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.