Top Newsराजकारण

शरद पवारांच्या मेट्रो पाहणीनंतर ‘भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?’ रोहित पवारांचा चंद्रकांतदादांना सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोची पाहणी केली. पवारांनी यावेळी मेट्रोची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

आदरणीय पवार साहेबांनी मेट्रोची पाहणी केली म्हणून लगेच मेट्रोवर हक्कभंग आणण्याची भाषा? यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती? असो! स्व. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते….”छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता”, असं ट्वीट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केलीय.

चंद्रकांत पाटलांची नेमकी टीका काय?

पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांचा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘पुणे पिंपरीतल्या आमदार-खासदाराला न कळवता, माननीय शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली. पवारांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. ते राज्यसभा सदस्यही आहेत. पण अशा प्रकारे घाईत ट्रायल घेण्याचं काय कारण? यातून श्रेयवादाची लढाई चाललीय का?

त्याचबरोबर ११ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. कंपनीला गॅरेंटी आणि इतर असा केंद्र सरकारने ८ हजार कोटी रुपयांचा वाटा त्यात उचलला आहे. ३ हजार कोटी रुपये महापालिकेने दिले. राज्य सरकारचा काही वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. कोविड परिस्थितीमुळे उशीरा कार्यक्रम घेऊ, असे ठरले होते. पण शरद पवार यांना ट्रायल घेण्याची एवढी घाई कशासाठी झाली?, असा सवालही पाटील यांनी केला.

महामेट्रोचं स्पष्टीकरण

शब्द पवारांच्या याच मेट्रो प्रवासावर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे सांगत टीका केली होती. तसेच मेट्रो प्रशासनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पुणे महामेट्रोकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. मेट्रो प्रकल्पाची माहिती हवी म्हणून शरद पवारांकडून आम्हाला विचारणा करण्यात आली होती. पुणे मेट्रोचे काम सुरू होऊन साडेचार वर्षे झाली, परंतु ते आतापर्यंत कधीही आले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना फुगेवाडी येथील मेट्रो स्टेशनच्या कार्यालयात बोलावले. त्यानुसार ते आज या ठिकाणी आले होते.

हा प्रकल्प कधी सुरू झाला, खर्च किती, सध्याची स्थिती काय आहे ही सर्व माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर फुगेवाडी स्टेशनची त्यांना माहिती दिली आणि नंतर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. आजच्या भेटीत मेट्रोची ट्रायल रण झाली नाही, शरद पवारांना फक्त मेट्रो संदर्भातली माहिती देण्यात आली. या मार्गावरील मेट्रोची ट्रायल २०१९ मध्येच झाल्याचे महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button