संजय राठोडांच्या अडचणीत आणखी भर; शरीरसुखाची मागणी केल्याची नवी तक्रार!
भाजप नेत्या चित्र वाघ यांचा आरोप
मुंबई : बंजारा समाजातील एका २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्यानं अडचणीत आलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर अनेक दिवसांपासून संजय राठोड यांना अटक करा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान भाजपने संजय राठोडबाबत आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राठोड यांच्यावर गंभार आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत तक्रार एका महिलेने यवतमाळ पोस्टाने पाठवली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. संजय राठोड आजही शरीरसुखाची मागणी करुन लैगिंक छळ करत असल्याचं तक्रार करणाऱ्या महिलेनं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचं दिसून येत आहे. संजय राठोड यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून, चित्रा वाघ यांच्या आरोपावर काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या युवतीने वानवडीतील हेवन पार्क इमारतीतल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ७ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणाशी तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पूजा चव्हाण हिची आत्महत्या होण्यापूर्वी तिचा आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते. या संभाषणातील एक आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा अहवाल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला होता. याला पुणे पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिला असून हा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच मिळाल्याचे सांगितले आहे.