Top Newsराजकारण

अभिनेता सोनू सूदच्या बहिणीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात मजुरांचा कैवारी म्हणून अभिनेता सोनू सूद जगासमोर आला. सोनू सूद गरजू कामगार आणि लोकांना करत असलेल्या मदतीमुळे जगभरात त्याला एक वेगळी ओळख मिळाली. आता त्याच्या कुटुंबातील सदस्याने सक्रिय राजकारण उडी घेतली आहे. सोनू सूदची बहीण मालविका सूद यांनी आज पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

एका चांगल्या कुटुंबातील व्यक्ती आमच्या पक्षात आला ही आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी चन्नी यांनी दिलीय. तर सोनू सूद मानवता आणि दयाळू वृत्तीमुळे संपूर्ण जगात ओळखले जातात. आज त्यांच्या परिवरातील एक सदस्य आमच्याशी जोडला गेला आहे. त्या सुशिक्षित महिला आहेत, असं नवज्योत सिंह सिद्धू यांनी म्हटलंय.

निवडणूक आयोगाने शनिवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारीरोजी मतदान होईल. तर निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. अशावेळी मालविका सूद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पंजाब काँग्रेसला मोठं बळ मिळाल्याचं बोललं जात आहे.

यापूर्वी सोमवारी नवज्योत सिंह सिद्धू यांनी मोगामध्ये अभिनेता सोनू सूद आणि त्याची बहीण मालविका सूद सचर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज मालविका सूद यांनी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय. अशावेळी काँग्रेस मालविका सूद यांना मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तिकीट वाटपाच्या घोषणेनंतरच मालविका सूद काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. मागील महिन्यात सोनू सूदने चंदीगढजवळ एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी बहीण मालविका यांना निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर पंजाबमधील राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. तसंच सोनू सूद यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेलाही उधाण आलं होतं. एका आठवड्यापूर्वीच सोनू सूदने सांगितलं होतं की त्याच्याकडे अनेक राजकीय पक्षांच्या ऑफर आहेत. मात्र लवकरच आपण एखाद्या पक्षाची निवड करु, असं सोनू सूद म्हणाला होता. मालविका या सोनू सूदची लहान बहीण आहेत. ३८ वर्षीय मालविका मोगामध्ये एक कोचिंग क्लासेस चालवतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button