मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

ठाणे : सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने आज येथे निधन झाले. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासले होते. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास ठाणे येथे अखेरचा श्वास घेतला.

किशोर नांदलस्कर यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे बालपणपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून देखील त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटके बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाची आवड त्यांना बालपणापासूनच होती

‘आमराई’ या नाटकातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. खरं तर या नाटकात त्यांची भूमिका ‘बाप्पा’ अशी हाक मारण्यापूरतीच होती. मात्र, हीच त्यांची खरी सुरुवात होती. एका नामांकित वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी यासंदर्भात अनेक आठवणी सांगितल्या होत्या. पहिल्याच नाटकात भीती वाटल्यामुळे एक शब्द देखील तोंडून निघाला नाही आणि त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांचे हसे केले होते. हा माझ्यासाठी पहिला धडा होता असे ते नेहमी म्हणत.

किशोर नांदलस्कर यांनी वास्तव सिनेमात दीड फुट्याच्या बापाची साकारलेली भूमिका असो वा गोविंदाच्या ‘जिस देश में गंगा रहता है’मधील ‘सन्नाटा’ असो, या भूमिका गाजवल्या. किशोर नांदलस्कर हे पूर्वी मुंबईतील भोईवाडा-परळ इथे राहात होते. मुंबईतील घर अगदी लहान असल्यामुळे ते मंदिरात झोपायचे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मंजूर केलं होतं. त्यांना बोरिवलीत चांगलं घर मिळालं होतं.

नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि तर, २० हून अधिक मालिकांमधून काम केले होते. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button