मुंबई : प्रसिद्ध अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनयाबरोबरच राजकीय आणि सामाजिक विषयांवरील प्रखर भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या विषयांबाबत ते सोशल मीडियावर व्यक्त होत आले आहेत. मात्र आता हीच राजकीय भूमिका त्यांना नडल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही काळापासून किरण माने हे स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या प्रसिद्ध मालिकेत काम करत होते. मात्र त्यांना या मालिकेतमधून तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आपल्याला आपल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केला आहे.
किरण माने यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली असून, त्यामधून त्यांनी सूचक इशारा दिला आहे. ‘काट लो जुबान, आंसूओसे गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मै, पेड बनही जाऊंगा!!!’ असे त्यांनी या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यावर आता किरण माने यांच्या चाहत्यांकडून समर्थनार्थ प्रतिक्रिया येत आहेत. मात्र काही प्रतिक्रियांमधून त्यांच्यावर टीकाही होत आहे. याबाबत किरण माने म्हणाले की, मला मालिकेतून बाहेर काढण्यासाठी स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं गेलं. महाराष्ट्रात असं होणार नाही, असं मला वाटत होतं. मात्र माझ्याबाबतीत असं घडलं. मी बळी पडलो आहे. हा अभिनयक्षेत्रात माझा झालेला खून आहे. ही बाब मी जीवनभर लक्षात ठेवीन, अशा शब्दात किरण माने यांनी संताप व्यक्त केला आहे.
किरण माने हे मुलगी झाली हो या मालिकेत वडिलांची भूमिका करत होते. तसेच त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अशा परिस्थितीत त्यांना तडकाफडकी मालिकेतून बाहेर काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच आता या विषयाने राजकीय वळण घेतले आहे. तसेच #IStandWithKiranMane हा ट्रेंड ट्विटर वर ट्रेंड होत आहे.
नेत्यांचा पाठिंबा
दरम्यान, राज्यातील बडे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे. माने केंद्र सरकारविरोधात लिहितात म्हणून त्यांना हटवलं गेलं. कुणाच्या भाकरीवर टाच आणणं चुकीचं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. त्यांनी आपली भूमिका ट्विटद्वारे मांडली आहे.
स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2022
या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला.
याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2022
‘या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल. देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला गेला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासतो. स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने हा अभिनेता फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहतो. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो, म्हणून अचानक मालिकेतूल काढुन टाकले गेले. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पण हीच भाजपा सेलीब्रिटींवर दबाव आणून आपल्या शेतकरीविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावे व स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावे. भाजपातर्फे कोणी दबाव आणला याची चौकशी व्हावी
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 13, 2022
घटनेचा काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही निषेध केला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजप विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे.