अभिनेते अनुपम श्याम यांचे मुंबईत निधन
मुंबई: टीव्ही आणि बॉलिवूडचे वरिष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन झालं आहे. अवयव निकामी झाल्यानं त्याचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. ते ६३ वर्षांचे होते. अनुपम यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करायचे बंद झाल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून डायलिसिस करत होते. त्यांच्यावर मुंबईच्या लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू होते. अनुपम यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेक कलाकारांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अनुपम यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, दिग्गज अभिनेता अनुपम श्याम यांचं मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे निधन झालं. हे सिनेसृष्टी आणि टीव्ही जगताचं मोठं नुकसान आहे.
अनुपम श्याम ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. यामध्ये त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती. ते खऱ्या आयुष्यातही याच नावाने ओळखले जातात. ‘सदरादी बेगम’, ‘बँडिट क्वीन’, ‘हजार चौरासी की माँ’, ‘दुश्मन’, ‘सत्या’, ‘दिल से’, ‘जख्म’, ‘प्यार तो होना ही था’, ‘कच्चे धागे’, ‘नायक’, ‘स्लमडॉग मिलेनियर’ आणि मुन्ना सायकल सारख्या सिनेमात काम केलं आहे.