Top Newsमनोरंजन

अभिनेता अनिकेत विश्वासराववर पत्नीचा छळ, मारहाण केल्याचा गुन्हा

पुणे : प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरिक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ कलमाखाली अनिकेत याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय २९, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. पतीचे अनैतिक संबंध तसेच करिअरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भितीने जीवे मारण्याची धमकी देऊन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केला. स्नेहा यांच्या सासु, सासरे यांनी फिर्यादीवर होणार्‍या अत्याचाराला न रोखता त्याची पाठराखण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा २०१८ मध्ये विवाह झाला आहे. स्नेहा चव्हाण याही अभिनेत्री असून त्यांनी मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री स्नेहा चव्हाणची आई राधिका चव्हाण या देखील मराठी मालिका अभिनेत्री आहेत. अनिकेत विश्वासराव हा मुळचा मुंबईचा आहे. गेल्या काही दिवसांपासून स्नेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. त्यातून फेब्रुवारी २०२१मध्ये स्नेहा या माहेरी पुण्यात परत आल्या. त्यानंतर आता त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button