दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन वस्तूनिष्ठपणे न करणाऱ्या शाळांवर कारवाई; बोर्डाचा इशारा

पुणे: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तुनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारनं निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे वस्तूनिष्ठपणे निकाल जाहीर करावा, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीच्या नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई होणार आहे. मुल्यमापनात फेरफार झाल्यास शाळांची मान्यताच होणार रद्द किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक बोर्डाकडून काढून घेण्यात येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल ,दहावीच्या मूल्यमापनाची कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीच्या पडताळणीनंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. शाळास्तरावर निकालाची तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत होणार आहे. दहावीच्या मूल्यमापनासंदर्भात माध्यमिक बोर्डाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.




