Top Newsअर्थ-उद्योग

पीएमसी बँकेसह महाराष्ट्रातील ११ बँकेच्या खातेदारांना डिसेंबरपर्यंत ५ लाख रुपये काढता येणार

मुंबई : कर्ज घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादलेल्या पंजाब-महाराष्ट्र बँकेसह महाराष्ट्रातील ११ बँकेच्या खातेदारांना खातेदारांना दिलासा मिळाला आहे. बँकेत जमा केलेले आपल्या कष्टाचे पैसे काढू न शकल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या पीएमसी बँकेसह देशातील २१ बँकांच्या खातेदारांना येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत बँकेतील आपल्या खात्यातून ५ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनने (डीआयसीजीसी) खातेदारांना आशेचा किरण दाखवला असून डिपॉझिट विम्याचे दावे करण्याचे निर्देश संबंधित बँकांना दिले आहेत.

पीएमसी बँकेत कर्ज घोटाळ्यामुळे त्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले. त्याला गुरुवारी तब्बल दोन वर्षे होत आहेत. निर्बंधांमुळे हजारो खातेदारांचे पैसे बँकेत अडकले. स्वत:च्या कमाईचे पैसे अडचणीच्यावेळेतही काढता येत नसल्यामुळे खातेदार हवालदिल झाले होते. त्याचा परिणाम काही ज्येष्ठ नागरिकांनी तो ताण सहन झाल्यामुळे प्राणही सोडले. पीएमसी बँकेच्या सुमारे १४ खातेदारांचा मृत्यू झाला. अनेक खातेदारांनी कोर्टाची दारे ठोठावली. रिझर्व्ह बँकेच्या समोर निर्दशने केली. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. खातेदारांनी पैसे मिळतील, याची आशा सोडली असताना डीआयसीजीसीने त्यांना दिलासा दिला आहे.

ज्या बँकांनी विमा काढला आहे अशा बँकांमधील खातेदारांना डीआयसीजीसीकडून जास्तीतजास्त त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे पैसे ९० दिवसांत काढायचे आहेत. हे दावे कलम १८ ए अन्वये निकालात काढण्यात येणार असून कार्पोरेशनच्या नियमानुसार हे पैसे मिळणार असल्याचे डीआयसीजीसीने बुधवारी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

डीआयसीजीसीच्या निर्देशांनुसार, ज्यांना क्रेडिट इन्शुरन्सचा दावा करायचा आहे त्या खातेदारांची यादी बँकांनी तयार करायची आहे. त्यानंतर हे सर्व दावे कार्पोरेशनकडे १५ ऑक्टोबरपर्यंत करायचे आहेत. २९ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ४५ दिवसांच्या मुदतीत दावे अद्ययावत करायचे आहेत. ही दाव्यांची अंतिम यादी कार्पोरेशनच्या नियमांनुसार असावी, असे कार्पोरेशनच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी योजनेनुसार पीएमसीसह २१ बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातील पाच लाखांच्या रकमेपर्यंतचा निधी काढता येणार आहे. २३ सप्टेंबर २०१९ रोजी पीएमसी बँकेवर निर्बंध लादण्यात आले. हे निर्बंध मध्यंतरीच्या काळात शिथिल करण्यात आले. मात्र, रिझर्व्ह बँकेने लावलेल्या या निर्बंधांमुळे पीएमसी बँकेच्या खातेदारांना आतापर्यंत आपल्या खात्यातून फक्त एक लाख रुपये काढता आले आहेत. अनेक खातेदारांचे लाखो रुपये खात्यात असताना त्यांना काही ते पैसे काढता आले नाहीत. आता मात्र ही परिस्थिती बदलणार आहे. पीएमसी बँकेसह २१ बँकेच्या खातेदारांना आता जास्त रकमेचे दावे करता येणार आहेत.

खातेदारांना पैसे काढता येणार्‍या महाराष्ट्रातील बँका

१) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड
२) सिटी सहकारी बँक लिमिटेड
३) कपोल सहकारी बँक लिमिटेड
४) मराठा सहकारी बँक लिमिटेड, मुंबई
५) नीड ऑफ लाईफ सहकारी बँक लिमिटेड.
६) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील स. बँक
७) रुपी सहकारी बँक लिमिटेड
८) श्री आनंद सहकारी बँक, पुणे
९) मंथन अर्बन सहकारी बँक
१०) सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक
११) इन्डिपेंडन्स सहकारी बँक, नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button