मुंबई : सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं असेही पवार यांनी सांगितले. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना देखील माझ्यावरही असेच आरोप केले जात होते असेही पवार यावेळी म्हणाले.
सध्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो त्याचं हे उदाहरण आहे. नवाब मलिक जाहीरपणे बोलातात त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे अधिक भाष्य करायची गरज नसल्याचे पवार यांनी सांगितले. पुरावे कशाचे? कसली केस काढली त्यांनी? एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषत: मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं. कोण काय, कुठं काय माहिती नाही. देशात हे सुरु आहे. हे काही नवीन नाही. मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी माझ्यावरही असाच आरोप होता. त्यावेळीही असं वातावरण तयार केलं होतं. २५ वर्षे झाली. केंद्र सरकार किंवा एजन्सीबद्दल जे बोलतात त्यांना यंत्रणांचा गैरवापर करुन त्रास दिला जातोय, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. संजय राऊत काय म्हणाले त्याची मला कल्पना नाही, मी त्याच्यावर भाष्य करण्याचं कारण नाही असेही पवार म्हणाले.
नवाब मलिक यांची २० वर्षांनी चौकशी का? संजय राऊतांचा सवाल
केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची २० वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खा. संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीचे लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठिक आहे. चौकशी होईल आम्ही वाट पाहतोय. नक्कीच संध्याकाळी ते घरी येतील. आताच माझं वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची. चौकशी पण कशी हे २० वर्षांनी करत आहेत.
किरीट सोमय्या यांनी काही प्रकरणं ईडीकडे दिली आहेत. भाजपच्याच नेत्यांची, आज जे भाजपमध्ये मंत्री आहेत, त्यांची अनेक प्रकरणं. भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा, त्याच्यासाठी हा शब्द चांगला आहे. कारण त्यांना मी काहीही बोललो तर वाटतं मी शिवी दिली. हे जे महात्मा आहेत, त्यांनी ईडीकडे अनेकांची प्रकरणं दिली आहेत. त्यांना का समन्स दिलं गेलं नाही? त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी का नाही पोहोचले? आता ही सगळी प्रकरणं आम्ही पुन्हा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. ज्या तक्रारी आधी केलेल्या आहेत, त्याचं पुढे काय झालं? का ईडीची पथकं फक्त महाविका आघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादवांचा पक्ष, लालू यादवांचा पक्ष यांच्यापुरतीच मर्यादीत आहेत?, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
२०२४ पर्यंत हे सगळं चालेल. त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, असा अप्रत्यक्ष इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे. तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “जे भाजपचे विरोधक आहेत किंवा जे सत्य बाहेर आणतायत. त्यांच्याचमागे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात. पण आम्ही घाबरत नाही. ही लढाई सुरुच राहिल, त्यांना येऊ द्या, तपास करु द्या. कितीही बनावट करु द्या, शेवटी सत्याचा विजय या देशात होत असतो. प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे. आताच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. अनेक विषयांवर चर्चा झाली. सोपं नाही. २०२४ नंतर जे काही घडणार आहे, त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी, असं संजय राऊत म्हणाले.