मुंबई : भाजपच्या केंद्रात मंत्री झालेल्या चारही नेत्यांनी आपापल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही गुरुवारपासून मुंबईतून आपल्या जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला. मुंबई विमानतळावरून सुरुवात करत कलानगर येथून दादर येथे ही यात्रा पुढे गेली. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्ध्वस्त केले आहे. मुंबई महापालिकेतील ३२ वर्षांचा पापाचा घडा आता फुटल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. याला शिवसेनेच्या आमदाराने प्रत्युत्तर देत, भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल, असा पलटवार केला.
नारायण राणेंनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असे मी समजतो. स्मृतीस्थळ आणि स्मारकांवर कुणाला रोखण्याचा प्रकार कुणी करू नये. बाळासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हते. ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच खूप आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली. याला शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत. महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो महसूल आहे तो वसूल करत आहे. पण भाजप नेत्यांना त्यांच्या काळात जी वसुली होत होती, त्याची आठवण येत असेल, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांच्या शिवसंपर्क अभियानामुळेच भाजपच्या नेत्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली, असे सत्तार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना संकटमोचन हे नाव दिले गेले आहे. अनेक संकटे येत आहेत, तरीही ते उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, दिल्लीच्या सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे हे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेमध्ये जनतेशी संवाद कमी झाल्याचे सांगितले गेले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवेल, अशी टीका सत्तार यांनी केली आहे.