राजकारण

‘आप’ गुजरात विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; मोदी-शहांच्या होमग्राऊंडवर आव्हान

अहमदाबाद: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला आम आदमी पक्षाकडून आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या होमग्राऊंडवर सर्वच्या सर्व जागा लढण्याची घोषणा आपचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल सध्या अहमदाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयाचं उद्घाटनही केलं.

गेल्या आठवड्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याच वेळी आम आदमी पार्टीने आगामी गुजरात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का बसला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अहमदाबादमध्ये माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. गढवी शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्यानं उपस्थित करत असतात. पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर केजरीवालांनी पत्रकारांशी संवाद साधला. २०२२ मध्ये आपगुजरातमधील सर्व जागा लढवेल. आम्ही गुजरातला एक नवं मॉडेल देऊ. गुजरातचं मॉडेल दिल्ली मॉडेलपेक्षा वेगळं असेल. आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. त्यावरच आमचं राजकारण आधारित असेल, असं केजरीवाल म्हणाले.

२०२२ मध्ये आम्ही स्थानिक जनतेच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवू आणि चेहरादेखील इथलाच असेल, अशी महत्त्वाची घोषणा केजरीवाल यांनी केली. भाजप आणि काँग्रेस सरकारांच्या कारस्थानांमुळे आज गुजरातची ही अवस्था आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे. २७ वर्षांपासून भाजप आणि काँग्रेसची मैत्री आहे. काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. भाजपच्या गरजेनुसार काँग्रेसकडून पुरवठा केला जातो, अशा शब्दांत केजरीवालांनी गुजरातमधील काँग्रेस, भाजपच्या राजकारणावर तोंडसुख घेतलं.

अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर केजरीवाल थेट आश्रम रोडवरील आपच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते वल्लभ सदन हवेली मंदिरात पोहोचले आणि तिथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दोन्ही पक्ष गुजरातमध्ये आपआपलं दुकान चालवत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला मदत हवी तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांना मालाचा पुरवठा केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये 27 वर्षांपासूनचा दोस्ताना आहे. ही दोस्तीच ते निभावत आहेत. त्यामुळे जनतेचं मात्र शोषण होत आहे, असं केजरीवाल म्हणाले.

गुजरात मॉडल आम्ही दुरुस्त करू

सध्या काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. व्यापारी वर्ग बिथरलेला आहे. याला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. गुजरात मॉडल सध्या खराब परिस्थिती आहेत. आम्ही हे मॉडल दुरुस्त करू, असं ते म्हणाले. यापूर्वी केजरीवाल फेब्रुवारी महिन्यात सूतरला गेले होते. आपने गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी मोठं यश मिळवलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button