…तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक; आरोग्य तज्ज्ञांचा गंभीर इशारा
नवी दिल्ली : जवळपास अडीच ते तीन महिने देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे अडखळलेली देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणाची मोहीम अद्याप रुळावर येऊ शकलेली नाही. राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांत लसींचा तुटवडा दिसून येत आहे. दिल्लीत एकीकडे सरकारी लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा आहे तर खासगी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर लसी दिसून येत आहेत. दरम्यान, लसीकरणाची परिस्थिती अशीच राहिली तर तिसरी लाट अधिक धोकादायक ठरू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
डॉ. युद्धवीर सिंग यांनी सांगितले की, जर दिल्लीमध्ये कोरोना लसीकरणाची स्थिती अशीच राहिली तर तिसरी लाट धोकादायक रूप घेऊ शकते. दिल्लीमध्ये खूप कमी लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणे आवश्यक आहे. खासगी लसीकरण केंद्रातील लसींचे दर निश्चित केले गेले पाहिजेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांना लस मिळणे शक्य होईल.
डॉ. युद्धवीर सिंग यांनी सांगितले की, ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनेशनबाबत एकदा विचार करण्याची गरज आहे. कारण यामुळे ऑब्झर्वेशन प्रक्रिया समाप्त झाली आहे. लसीकरणानंतर अर्ध्या तासापर्यंत निरीक्षणाखाली राहणे आवश्यक आहे. मात्र ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनेशनमध्ये असे होत नाही आहे. तसेच लसीची कोल्ड चेन मेंटेन करण्यामध्येही अडथळे येत आहेत. त्यामुळे ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनबाबत पुन्हा विचार होणे आवश्यक आहे.
मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. विवेक कुमार यांनी सांगितले की, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट कधीही येऊ शकते. त्यामुळे आपण पूर्ण तयारी करून ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाले तर तिसऱ्या लाटेचा धोका हा कमी असेल. मात्र लसीकरण झाले नाही आणि आता आहे तशी परिस्थिती असे तर मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.