राजकारण

परमबीर सिंग यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार : अनिल देशमुख

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, एक प्रसिद्ध पत्रक जारी अनिल देशमुखांनी हे आरोप फेटाळून लावले असून ते परमबीर सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहेत. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे, असे देशमुख म्हणाले.

परमबीर सिंग यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनिल देशमुख यांनी काही महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?

परमबीर सिंग यांना आपल्याला १७ मार्चला पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळवताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?

१८ मार्च रोजी मी एका कार्यक्रमामध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटवले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने १९ मार्चला पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस खात्यातील सर्वांना माहित आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.

परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करत आहे.

सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात, तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?

विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button