आरोग्य

किराणा, बेकरी, भाजी-फळे, मासे-चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ वेळेतच सुरु राहणार

कोरोनाची नवी नियमावली जाहीर

मुंबई: कोरोना प्रसार थांबविण्यासाठी शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, मासे-चिकन-मटण, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्य विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील.

नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही ७ ते ११ ची मर्यादा घालून देण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.

मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन आणि वारंवार सूचना देऊनही मुंबईच्या दादर परिसरातील भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करत असल्याने आता हे मार्केट स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत वारंवार सांगूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये भाजी मार्केटमध्ये सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दी होते. गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. तशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून आता पालिकेकडून दादर मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button