गुजरातपाठोपाठ गोव्यातही १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द

पणजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने कालच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
केंद्र सरकारने सीबीएसई परीक्षांबाबत निर्णय घेतल्यानंतर लागलीच गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या फक्त २४ तास आधी गुजरात बोर्डाने बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १ जुलैपासून बारावी पुनर्परीक्षा आणि बाह्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
गोव्यात बारावीच्या परीक्षांबाबत तीन पर्याय सरकारच्या विचाराधीन होते एक तर परीक्षा पूर्णता रद्द करणे, दुसरा पर्याय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना बसू देणे आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांना अंतर्गत गुणांच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश देणे व दोन्हींचे निकाल एकत्रच जाहीर करणे. मात्र, अखेर तज्ज्ञांचा विचार घेऊन आणि राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करता अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डानं बारावीच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी मुख्य सचिव, शिक्षण सचिव, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे संचालक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी याबाबत निर्णय घेण्यात आला. सीबीएसई तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्याही आम्ही संपर्कात आहोत. इतर राज्यांच्या शालांत व उच्च माध्यमिक मंडळांनी बारावीबाबत काय निर्णय घेतला आहे हे तपासून आज सायंकाळपर्यंत आम्ही काय तो अंतिम निर्णय घेऊ. या परीक्षांविषयी आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार होता, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.




