शिक्षण

विद्यार्थ्यांना दिलासा! ‘एमपीएससी’च्या परीक्षा महापोर्टलवर घेण्याची आयोगाची तयारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (‘एमपीएससी’) नं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘एमपीएससी’च्या रखडलेल्या गट ब, गट क, आणि गट ड च्या परीक्षा महापोर्टलवर घेण्यात याव्यात अशी मागणी हजारो ‘एमपीएससी’चे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने या परीक्षा महापोर्टलवर घेण्यात येतील का? अशी विचारणा लोकसेवा आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार लोकसेवा आयोगानं राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे.

लोकसेवा आयोगाने राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदासाठी परीक्षांचे आयोजन करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारसमोर याबाबत काही मुद्दे आणि अटी देखील लोकसेवा आयोगाने मांडल्या आहेत. यावर मात्र सरकारचे अपेक्षित उत्तर येणे अद्याप बाकी आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (‘एमपीएससी’) ने महाराष्ट्र शासनाच्या १८ जून २०२० च्या पत्राला उत्तर देताना काही अटींवर सर्व शासकीय कार्यलयातील गट ब तसेच गट क संवर्गातील पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. यातील आयोगाच्या प्रमुख मागण्या म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनियम १९६५ मध्ये आवश्यक ते बदल करणे. सर्व शासकीय विभागांच्या सर्व संवर्गांचे सेवा प्रवेश नियम आयोगाच्या सहमतीनं सुधारित करणे, लोकसेवा आयोगाकडील मनुष्यबळ वाढवणे, यासह अटींवर लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यास तयार असल्याचं सरकारला कळवण्यात आलं आहे. परंतु यावर राज्य सरकारचा अद्याप निर्णय येणे बाकी आहे.

दरम्यान गेल्या काही काळापासून कोरोनामुळे भरती परीक्षा रखडल्या आहेत, तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीही भरती करुन घेतली जात नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पण आता एमपीएससी परीक्षांसंदर्भात आयोगाने सकारात्मक निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button