मिलर, मॉरिसची फटकेबाजी; राजस्थानचा दिल्लीवर विजय
अखेरच्या षटकात मॉरिसने दोन षटकार मारत राजस्थानला मिळवून दिला विजय

मुंबई : डेविड मिलर आणि क्रिस मॉरिस या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट राखून मात केली. राजस्थानचा हा यंदाच्या मोसमातील पहिला विजय ठरला. या सामन्यात राजस्थानने दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४७ धावांवर रोखले होते. याचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची ५ बाद ४२ अशी अवस्था होती. मात्र, मिलरने उत्कृष्ट फलंदाजी करत ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर मॉरिसने १८ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात १२ धावांची आवश्यकता असताना मॉरिसने टॉम करनच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिला.
त्याआधी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जयदेव उनाडकटने पृथ्वी शॉ (२), शिखर धवन (९) आणि अजिंक्य रहाणे (८) यांना झटपट बाद केले. यानंतर मात्र कर्णधार रिषभ पंतने दिल्लीचा डाव सावरला. त्याने ३२ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. त्याला ललित यादव (२०) आणि टॉम करन (२१) यांची काहीशी साथ लाभली. त्यामुळे दिल्लीने २० षटकांत ८ बाद १४७ अशी धावसंख्या उभारली. राजस्थानच्या उनाडकटने तीन, तर मुस्ताफिझूर रहमानने दोन विकेट घेतल्या.
दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान रॉयल्सपुढे मोठे आव्हान ठेवता आले नव्हते. पण त्यांच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला होता आणि राजस्थानला अडचणीत आणले होते. पण डेव्हिड मिलरचे अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस मॉरिसमुळे राजस्थानला तीन विकेट्स राखून दिल्लीवर विजय साकारता आला. विजयासह राजस्थानने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर त्यांच्या खात्यामध्ये दोन गुणही जमा झाले आहेत.
दिल्लीचे १४८ धावांचे आव्हान माफक वाटत असले तरी यावेळी राजस्थानची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. दिल्लीच्या ख्रिस वोक्सने यावेळी राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांची २ बाद १३ अशी अवस्था केली. त्यानंतर गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनने चौकारासह सुरुवात केली असली तरी त्याला कागिसो रबाडाने बाद केले आणि राजस्थानची ३ बाद १७ अशी अवस्था झाली. त्यानंतर शिवम दुबे आणि रियान परागही लवकर आऊट झाले आणि त्यामुळेच राजस्थानने ५० धावा करण्यापूर्वीच त्यांचा अर्धा संघ गारद झाला आहे.
राजस्थानची ५ बाद ४२ अशी अवस्था होती. त्यावेळी आज संघात पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड मिलरने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मिलरने यावेळी ४३ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात मिलर आऊट झाला आणि पुन्हा एकदा राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. पण त्यानंतर मॉरिसने षटाकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मॉरिसने यावेळी १८ चेंडूंत ४ षटाकाराच्या जोरावर ३६ धावा केल्या.
राजस्थानने यावेळी नाणेफेक जिंकली आणि त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी राजस्थानच्या संघात पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटने दिल्लीला एकामागून एक तीन धक्के दिले. उनाडकटने यावेळी गेल्या सामन्यात दिल्लीसाठी मॅच विनर ठरलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांना झटपट बाद केले. त्यानंतर स्वत:च्या गोलंदाजीवर अजिंक्यचा झेल पकडला आणि राजस्थानची ३ बाद ३६ अशी अवस्था केली.
राजस्थानचे तीन फलंदाज बाद झाल्यावर चांगली परिस्थिती नव्हती. पण त्यावेळी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पंतने यावेळी ३२ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ५१ धावांची सर्वाधिक खेळी साकारली. पण पंत यावेळी धावचीत झाला आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या धावगतीला ब्रेक लागला. अखेरच्या षटकांमध्ये तळाच्या फलंदाजांनी थोड्या धावा जमवल्यामुळे दिल्लीला राजस्थानपुढे १४८ धावांचे आव्हान ठेवता आले. राजस्थानकडून यावेळी उनाडकटने सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर मुस्ताफिझूर रेहमानने यावेळी दोन फलंदाजांना बाद करत उनाडकटला चांगली साथ दिली.




