सत्या नाडेला, सुंदर पिचाई कोरोना संकटात मदतीसाठी पुढे सरसावले

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे झालेल्या विध्वंसानंतर आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल जगातील दोन बलाढ्य कंपन्याही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करु तशी माहिती दिली आहे.
भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील, असे सत्या नाडेल यांनी सांगितले. तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून १३५ कोटींचा निधी पुरविला जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले.
गेल्या २४ तासांत देशात ३ लाख, ५२ हजार ९९१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या २४ तासांमध्ये भारतात ३,५२,९९१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २८१२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, गेल्या २४ तासांत देशातील २,१९,२७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.
निर्मला सीतारामन यांच्या पतीची मोदी सरकारवर कडाडून टीका
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाल्यानंतर आता केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले.




