कोरोनावर ‘कोवॅक्सिन’ लस अधिक प्रभावी; ‘आयसीएमआर’च्या संशोधनानंतरचा निष्कर्ष

नवी दिल्ली : कोवॅक्सिन विरूद्ध कोविशिल्ड असा लस निर्मात्यांमधील वाद काही दिवसांपूर्वी भारतीयांना पाहिला होता. पण इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ‘आयसीएमआर’च्या नव्या दाव्यामुळे कोवॅक्सिनला यापुढच्या काळात झुकत माप मिळण्याची चिन्हे आहेत. भारतासह जगभरात १० देशांमध्ये थैमान घातलेल्या इंडियन डबल म्यूटंट आणि कोरोनाच्या यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेरीयंट विरोधात कोवॅक्सिन प्रभावी आणि परिणाम ठरत असल्याचा दावा ‘आयसीएमआर’ने केला आहे. त्यामुळेच येत्या दिवसात कोवॅक्सिनवर नागरिकांचा अधिक विश्वास निर्माण होईल असाच काहीसा दावा या अभ्यासातून झाला आहे. आयसीएमआरच्या दाव्यामुळे स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिनला मोठा आधार मिळाला असून भारतासह जगभरातच कोवॅक्सिवर विश्वास वाढण्यासाठी त्यामुळेच मदत मिळणार आहे.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR – आयसीएमआर) च्या अभ्यासानुसार COVAXIN ही SARS-COV-2 च्या विविध वेरीयंट विरोधात प्रभावी ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ही कोवॅक्सिन डबल म्यूटंटविरोधातही परिणामकारक असल्याचा दावा ‘आयसीएमआर’मार्फत करण्यात आला आहे. कोरोनाच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक घातक अशा वेरीयंटमध्ये यूके वेरीयंट, ब्राझील वेरीयंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेरीयंट विरोधात कोरोनाविरोधी अशी कोवॅक्सिन परिणामकारक ठरत असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे.
१ मेपासून देशातील सर्वात मोठा कोरोना लसीकरणाचा टप्पा सुरू होणार आहे. त्याआधी मेड इन इंडिया कोरोना लस कोवॅक्सिनबाबत ही मोठी माहिती समोर आली आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन ही कोरोना लस. या लशीचा सरासरी प्रभाव हा ७८% आहे. गंभीर कोरोनावर ही लस १००% प्रभावी आहे. यामुळे कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. लक्षण नसलेल्या रुग्णांसाठी ही लस ७०% टक्के प्रभावी आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा वेगही मंदावू शकतो. तर आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार ही लस डबल म्युटंट कोरोनाविरोधातही प्रभावी आहे.
देशातील लसीकरण मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी भारत बायोटेक पुढच्या महिन्यात म्हणजेच मेमध्ये कोव्हॅक्सिनच्या तीन कोटी डोसची निर्मिती करणार आहे. भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी याबाबतची माहिती दिली.




