Top Newsराजकारण

परमबीर सिंग यांची ७ तास चौकशी; सर्व आरोप फेटाळले

परमबीर सिंग-शिवसेनेचं साटंलोटं, चौकशी सीबीआयकडे सोपवा : भातखळकर

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आज अखेर मुंबईत दाखल झाले. गोरेगाव येथे दाखल करण्यात आलेल्या खंडणी वसुली प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंग आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष ११ मध्ये हजर झाले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर सिंग कक्ष ११ मधून बाहेर पडले.

परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती. आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर यांनी कोर्टात वकिलामार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला होता.

कोर्टाच्या निर्णयानंतर परमबीर सिंग आज मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्याविरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे परमबीर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

परमबीर सिंग-शिवसेनेचं साटंलोटं, चौकशी सीबीआयकडे सोपवा : भातखळकर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगून टाकले, त्यामुळे पहिल्या दिवसापासून परमबीर सिंग व शिवसेनेचं साटंलोटं असल्याचा आपला आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला असल्याचे वक्तव्य भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर तब्बल २६१ दिवस फरार असताना सुद्धा त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे का केली नाही? त्यांना होमगार्ड महासंचालक या पदावरून हटवण्याची कारवाई राज्य सरकारने का केली नाही? परमवीर सिंग यांच्यावर एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना शोधण्यासाठी विशेष पथक का स्थापन केले नाही? या बाबतीत केंद्र सरकार किंवा इतर राज्यांची मदत का मागितली नाही? याचे कारण म्हणजे ‘त्या अनिल वर आरोप केले तर केले, पण आमच्या अनिल वर कोणतेही आरोप करू नको, मी तुझ्यावर कारवाई करत नाही‘, अशा ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप‘ संवादातून शिवसेनेने हे सर्व नाटक चालविले आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेता त्याची निःपक्ष चौकशी व्हावी याकरिता तपास सीबीआय कडे द्यावा अशी मागणी सुध्दा भातखळकर यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button