भाजयुमो पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ जण निलंबित
जालना : काही दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरावरून व्हिडिओतील पोलिसांचा निषेध होऊ लागला. यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आहे. अखेर आज व्हिडिओतील पोलीस उपनिरीक्षकासह ५ जणांचे निलंबन झाले आहे. यासंदर्भातील कारवाई जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केली आहे.
शिवराज नारियलवाले यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची वस्तुस्थिती मांडणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरून भाजप आक्रमक झाली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर एक प्रकारचा दबाव आला होता. व्हिडिओतील प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी काल पोलीस अधीक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. आज अप्पर पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना चौकशीचा अहवाल दिला. त्यानंतर याप्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्याचा आदेश दिला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह ५ पोलीस कॉस्टेबलचा समावेश आहे.
दरम्यान आता हाच अहवाल औरंगाबादमधील आयजींकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या देखील याप्रकरणी औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक व्हिडिओमध्ये जे इतर अधिकारी दिसत आहेत. ते म्हणजे अट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २ लाखांची लाच घेणारे निलंबित डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याबाबत देखील निर्णय होऊ शकतो.