ठाणे : नाशिकमध्ये डेल्टा प्लसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातही चार जणांना डेल्टा प्लसची (नवीन व्हेरीयंट) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन रुग्णांनी ठाणे महापालिका आणि एकाने नवी मुंबई महापालिका हद्दीत रुग्णालयात उपचार घेतले आहेत. डेल्टा प्लसची लागण झालेले रुग्ण हे नेमके महापालिका हद्दीतील आहेत का याची शहानिशा करण्यासाठी त्यांचा शोध सुरू झाला असून त्यांनी कुठे उपचार घेतले आहे. याबाबत शोधमोहीम सुरू केली आहे.
याचदरम्यान ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून जाऊ नये, तर सतर्क राहण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच ठामपामधील तीन रुग्णांपैकी एक रुग्ण हा मालाड येथील रहिवासी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता ठाणे जिल्ह्यात चार जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाल्यावर आता आरोग्य विभाग खडबडून जागी झाला आहे. जून आणि जुलै महिन्यात पाठवलेल्या नमुन्यांमध्ये दोन महिला, दोन पुरुषांना डेल्टा प्लस या नवीन व्हेरीयंटची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. लागण झालेले रुग्ण हे साधारण २२ ते ३५ या वयोगटातील असून त्या चौघांमधील तिघांना ठाणे आणि एकाला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यावर तेथून त्यांचे नुमने तपासणीसाठी पाठवले होते.
त्याचा अहवाल रविवारी आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. त्यातच ठाण्यात उपचार घेणारा रुग्ण हा मालाड येथील असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तसेच ते रुग्ण आता बरे होऊन ठणठणीत घरी गेले आहे. तर दुसरीकडे ते रुग्ण कुठे आणि कधी उपचारार्थ दाखल होते, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.