ओव्हल : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारी म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह चार जणांना आयसोलेट केलं आहे.
बीसीसीआयने रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेट केलं आहे. बीसीसीआयने सांगितले की त्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे आणि ते टीम हॉटेलमध्ये राहणार आहे. मात्र, वैद्यकीय संघाकडून याची पुष्टी होईपर्यंत कोरोना संशयित टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही.
बीसीसीआयच्या मते, टीम इंडियाच्या उर्वरित सदस्यांची काल रात्री आणि दुसऱ्यांची सकाळी चाचणी घेण्यात आली. टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळत आहे. अशा परिस्थितीत, निगेटिव्ह कोविड अहवाल असलेल्या सदस्यांना ओव्हल येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.