शिक्षण

शिक्षक भरतीत २०६२ जागांसाठी होणार ३९०२ उमेदवारांची मुलाखत

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागात एकूण २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केलीय. याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच ही माहिती दिलीय. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.

वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”

दरम्यान, आदिवासी समाजातील डी.एड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी २३ ऑगस्टला पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं. पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या १६६२ रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या १६६२ रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रियेद्वारे भराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. वारंवार पत्रव्यवहार, निवेदने, आंदोलने करून सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे आदिवासी डीटीएड, बीएड कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आलं. जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणात मोठ्या संख्येने विद्यार्थिनींचा सहभाग होता.

राज्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button