मुंबई : मध्य रेल्वेवर ३६ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक असेल. हा मेगा ब्लॉक ०८ जानेवारी (शनिवार) रोजी दुपारी २ ते १० जानेवारी (सोमवार) रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर घेण्यात येईल.
36 hours infrastructure block on Thane-Kalva slow lines for 5th& 6th line work. Details 👇 pic.twitter.com/7tduTj1jmL
— Central Railway (@Central_Railway) January 7, 2022
शनिवारी दुपारी २ पासून सोमवारी दुपारी २ पर्यंत ठाणे-दिवा स्थानका दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे. ३६ तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकमध्ये किमान ३९० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. सोमवारी, लोकल गाड्या पुन्हा सुरू झाल्यावर, स्लो मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन मार्गावर प्रवास करता येईल. मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितले की, ‘या ३६ तासांच्या ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील सुमारे ३९० उपनगरीय रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, १८ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील आणि चार लांब पल्ल्याच्या गाड्या कमी केल्या जातील. ठाणे-दिवा दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गाच्या संबंधात नवीन टाकलेल्या ट्रॅकचे कट आणि कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.