आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी ३५० कोटी देणार
पुणे : आमदार निधीतून 350 कोटी आपण महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. आमदार निधी खर्च करण्यासंदर्भात चर्चा झाली, 4 कोटींपैकी 1 कोटी कोरोनावर खर्च करण्याची आमदारांना परवानगी दिली आहे, असंही त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. पुढच्या काळात रुग्ण वाढले तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स आणि रेमडेसिवीर चर्चा झालीय. रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानींसोबत मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनबाबत चर्चा केलीय, व्हेंटिलेटरसंदर्भात प्रकाश जावेडकर यांच्याशी चर्चा केल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय.
सोमवारी विभागीय आयुक्तांना ससूनच्या डॉक्टरासंदर्भात बैठक घेण्यास सांगितली आहे. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अडचणीच्या काळात त्यांनी सहकार्य करावे, असंही अजित पवार म्हणालेत. सरकार म्हणून काम करणारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकारण न आणता कोरोनाबाधितांचा जीव जाणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला लसीसंदर्भात परवानगी दिलेली आहे. सर्वाना रेमडेसिवीर देण्याची गरज नाहीये, असंही अजित पवार म्हणालेत.