लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेऊन मोठा उलटफेर केला. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटनं बुधवारी मंजुरी देखील दिली आहे आणि हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब देखील होणार आहे. भाजपानं कृषी कायदे मागे घेत विरोधकांच्या हातातून एक मोठा मुद्दाच खेचून घेतला आहे. यात आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी मोठी राजकीय खेळी केली आहे.
अखिलेश यादव यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी आंदोलकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. अखिलेश यादव यांनी यासंदर्भाती एक ट्विट आज केलं आहे. “शेतकऱ्यांचं आयुष्य अतिशय अमूल्य असतं. कारण ‘अन्य’ लोकांच्या आयुष्यासाठी ‘अन्न’ पीकवण्याचं काम शेतकरी करतात. आम्ही वचन देतो की २०२२ मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार येताच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केली जाईल. ‘शेतकरी शहादत सन्मान राशी’ योजनेअतंर्गत ही मदत केली जाईल”, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.
तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केंद्रानं केल्यानंतर शेतकरी आंदोलात आपला जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. कृषी कायद्यांविरोधात मोर्चा उघडणाऱ्या संयुक्त किसान मोर्चानं कायदेमागे घेण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली आहे. यात कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या माहितीनुसार गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ७०० शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची आणि मदतीची व्यवस्था सरकारनं करावी अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. यासोबतच शहीद शेतकऱ्यांच्या स्मृतीसाठी सिंघू बॉर्डरवर एक शहीद स्मारक बनवण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय दिल्ली, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांविरोधात आंदोलन केल्यामुळे गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
आप-सपामध्ये होणार युती?
उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांच्या बैठका सुरु झाल्या आहे. यातच आता आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी बुधवारी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बैठक झाली. या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र, समाजवादी पार्टीने दोन्ही नेत्यांमधील ही भेट एक शिष्टाचार असल्याचे म्हटले आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी आदमी पार्टीचे प्रभारी संजय सिंह बुधवारी लखनऊमधील ‘जनेश्वर ट्रस्ट’च्या कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. अखिलेश यांची भेट घेतल्यानंतर संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय सिंह म्हणाले, “भ्रष्टाचारमुक्त उत्तर प्रदेश आणि हुकूमशाही राजवट नष्ट करायची आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आज मुक्त उत्तर प्रदेश निर्माण करण्यासाठी राजकीय चर्चा करण्यात आल्या.”
याचबरोबर, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या युतीच्या प्रश्नावर संजय सिंह म्हणाले की, आम्ही एकमेकांशी बोलत आहोत आणि युतीच्या दिशेने जात आहोत. युतीबाबत चांगली अर्थपूर्ण चर्चा झाली असून, काही निर्णय होताच आपल्याला कळवण्यात येईल, असे संजय सिंह म्हणाले. तसेच, जागांबाबत चर्चा झाली आहे का? असा सवाल केल्यानंतर संजय सिंह म्हणाले की, आता समान अजेंड्यावर चर्चा झाली असून उत्तर प्रदेशला भाजपाच्या कुशासनातून मुक्त करायचे आहे. त्याबाबत चर्चा झाली आहे.