देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; २४ तासांत २२ हजार ८४२ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल २२ हजार ८४२ नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर, २४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्ण संख्या २ लाख ७० हजार ५५७ वर आली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण ३ कोटी ३७ लाख ८९ हजार ५४९ रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी ४ लाख ४८ हजार ८१७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये १३,८३४ नव्या रुग्णांची नोंद
देशातील राज्यांचा विचार करता, इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत १३ हजार २१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १२१ लोकांचा मृत्यू झाला. काल १४ हजार ४३७ लोकांनी कोरोनावर मात केली. आता केरळमध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १५५ एवढी आहे. याचबरोबर राज्यात आतापर्यंत २५ हजार ३०३ लोकांचा मृत्यू झाला आहे.