Uncategorizedआरोग्य

ठाण्यातील वर्तकनगरच्या दोस्ती कॉम्प्लेक्समधील रहिवाशी पोलिसांचे प्रचंड हाल

ठाणे : एमएमआरडीए दोस्ती कॉम्प्लेक्सला बिल्डिंग नंबर चार वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या बारा माळ्याच्या बिल्डिंगमध्ये कोपरी, वागळे, वर्तकनगर, कोर्टनाका येथील मोडकळीस आलेल्या पोलीस लाईन तोडून तेथील पोलीस कुटुंबांना दोस्ती कॉम्प्लेक्स या ठिकाणी मागील पाच वर्षांपूर्वी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना रहावयास घरे दिलेली आहेत. या ठिकाणी वारंवार लिफ्ट बंद पडत आहेत तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने दिवसभर काम करून घरी वापरणाऱ्या पोलिसांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या बिल्डींगच्या आजुबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. आतापर्यंत बरेच पोलीस व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना डेंग्यू , मलेरिया, कोरोना सारख्या भयंकर आजाराने दवाखान्यात दाखल झाले आहेत. इमारतीच्या लिफ्ट कायम बंद असतात. तळ भागावर खाली लाईट नसल्याने अंधार असतो, त्याचा फायदा घेऊन गाड्यांची पेट्रोल चोरी, पार्ट चोरी सारख्या घटना वारंवार या ठिकाणी घडत असतात, या ठिकाणी राहणारे पोलीस रात्री, अपरात्री ड्युटी वरुन येत जात असताना त्यांना लिफ्ट बंद असल्यामुळे पायपीट करत नाहक त्रास सहन करावा लागतो.

स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या इमारतीच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे या ठिकाणी राहत असलेले पोलीस सांगत आहेत. एखादा अनर्थ घडल्यानंतर सगळ्यांचेच डोळे उघडतील असे देखील या ठिकाणी राहणारे नागरिक सांगत आहेत. पिण्याकरिता पाणी अस्वच्छ येते ते देखील वेळेवर येत नाही. त्यामुळे बरेचसे पोलीस व त्यांचे कुटुंबीय नेहमी आजारी पडत असतात. सर्वत्र कोरोनामुळे स्वच्छता पाळण्यात येत आहे पण या इमारतीच्या परिसरात ठाणे महानगरपालिकेचे घन कचरा विभाग का लक्ष देत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्ये अंधाराचा फायदा घेऊन काही मद्यपी लोक रात्रीच्या वेळेस दारू पिऊन काचेच्या बाटल्या देखील त्याच ठिकाणी टाकत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य या ठिकाणी पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button