Top Newsशिक्षण

दहावीच्या निकालाचा खेळखंडोबा; १६ लाख विद्यार्थी ६ तासांपासून ताटकळत !

मुंबई : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल बोर्डानं पत्रकार परीषद घेत जाहीर केला. दुपारी एकच्या दरम्यानं दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार होता. मात्र, दोन्ही वेबसाईट डाऊन झाल्या. बोर्डानं आता निकालासाठी आणखी काही लिंक जाहीर केल्या आहेत. तर, निकालाच्या वेबसाईट पूर्वस्थितीत येण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं आहे.

वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल. तब्बल सहा तासांहून अधिक वेळ झाला तरी तरी वेबसाईट डाऊन आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु आहे. बोर्डानं सध्या आणखी तीन लिंक दिल्या आहेत. मात्र त्याही डाऊन असल्याचं समोर आलंय.

दहावीच्या निकालाची वेबसाईट अद्यापही काही ठिकाणी सुरु नाही. गेले साडेपाच तास वेबसाईट हँग झाली आहे. वेबसाईट सुरु कधी होणार यावर बोर्डाकडून कोणतेही ठोस उत्तर नाही. दिनकर पाटील आणि टेक्निकल टीम नॅशनल इन्फर्मेशन सेंटर (एनआयसी) कडे रवाना झाले आहेत.

एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. ६० हजार निकाल डाऊनलोड झाले. दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत यायला थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

सर्व्हरवर लोड आला असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं. पण तांत्रिकदृष्ट्या लोड येणार हे साहजिक होतं. दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १६ लाखांपेक्षा जास्त होती. त्यामुळे वेबसाईटवर निकाल लागण्यास सुरु झाल्यानंतर १६ लाख लोक एकत्र वेबसाईटवर येणे स्वाभाविक आहे. त्यासाठी बोर्डाने सर्व्हरची क्षमता वाढवून ठेवणे आवश्यक होतं. मात्र त्याची तयारी बोर्डाने केलीच नाही हे यावरुन स्पष्ट होतंय. राज्यातील दहावीचे १६ लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक दुपारी १ वाजल्यापासून ताटकळत आहेत. या सर्व गैरप्रकाराला कोण जबाबदार? त्यांच्यावर काय कारवाई होणार?

शालेय शिक्षणमंत्र्यांचे चौकशीचे निर्देश

दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button