Top Newsराजकारण

संविधान दिनाच्या कार्यक्रमावर १४ विरोधी पक्षांचा बहिष्कार; भाजपची टीका

नवी दिल्ली : संविधान दिन आज आहे. आजच्या दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, या कार्यक्रमात काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि टीएमसीसह १४ पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हिवाळी आधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष आणि सरकारमधील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल म्हणाले की, आजचा दिवस महत्त्वाचा असून पन्नास वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य करणारा काँग्रेससारखा पक्ष संविधान दिनावर बहिष्कार टाकत आहे. सभापतींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे म्हणजे बाबासाहेबांचा अपमान करणे आहे.

हा बहिष्कार टाकून काँग्रेसने सिद्ध केले की, ते फक्त त्यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान साजरा करतात आणि बाबासाहेब आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांच्या सन्मानाशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत मात्र या दिवसावर बहिष्कार टाकणे हा संविधानाचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, आमच्या देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. या विशेष दिवशी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच्या संविधान सभेतील भाषणाचा एक उतारा शेअर करत आहे, ज्यात त्यांनी मसुदा समितीने ठरवल्याप्रमाणे संविधानाचा मसुदा स्वीकारण्याचा ठराव मांडला होता.

राजकीय घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात : मोदी

राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, असं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एका पक्षाची सूत्रं पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणं लोकशाहीच्या विरोधात आहे. ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील? असा सवाल करत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणाही साधला. संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते, असंही ते म्हणाले.

संविधान दिवस समारंभात पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या पवित्र जागेवर काही लोकांनी भारताच्या कुशल भविष्यासाठी मंथन केलं होतं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्या दिवशी २००८ साली मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरुन गेला होता. आपल्या सैन्यानं दहशतवाद्यांशी निकराचा लढा दिला होता. यात जवानांसह काही नागरिकांनी बलिदान दिलं होतं. या सर्व वीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या आंबडवे गावात पहिल्यांदाच येणार राष्ट्रपती

भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळ गावाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार आहेत. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी ही स्मारक भेट होणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे आंबडवे आणि पंचतीर्थ घोषित अन्य ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार चाचपणी व तयारी असल्याचे तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंबडवे या गावी प्रथमच राष्ट्रपती येणार आहेत. राष्ट्रपतींचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा नियोजित असून यात किल्ले रायगड भेटीचाही समावेश आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या स्थळांना पंच तीर्थ म्हणून घोषित केले. यामध्ये त्यांचे मूळ गाव आंबडवे, जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवासस्थान आणि दिल्लीतील २६ अलिपूर रोड यांचा समावेश आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेलं आंबडवे गाव विकासापासून दूरच आहे. स्थानिक नेत्यांपासून राज्य, देशपातळीवरील मंत्री, नेते, अधिकाऱ्यांनी भेटी देत आदर्श संसद ग्राम, पंचतीर्थ, शिल्पसृष्टी, पर्यटन भवन, डिजिटल गाव, राष्ट्रीय महामार्ग अशा कोटींच्या विकास कामांची आश्वासने दिली; मात्र ही आश्वासने हवेतच विरली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button