Top Newsराजकारण

जळगाव जिल्ह्यातील बोधवडमधील भाजपच्या ११ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : जळगाव जिल्ह्यात भाजपला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाही. ज्येष्ठ नेते एकनाक खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा गड असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. आज बोधवडमधील ११ नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या ११ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक होते. त्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.

आज भाजपच्या बोधवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत ११ नगरसेवक यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय. पूर्वी मुक्ताईनगरचे ६ नगरसेवक शिवसेनेते दाखल झाले होते. आज मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तिथल्या आमदारांनी केलेली कामं आणि जनतेचा मिळवलेला विश्वास आणि उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.

दरम्यान, यावेळी हा धक्का भाजपला आहे की एकनाथ खडसे यांना? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी धक्का धक्का असतो. तो कुणाला हे तुम्ही ओळखून घ्या, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. तसंच हे नगरसेवक भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यामुळे हा धक्का भाजपलाच असल्याचं मी मानतो, असं पाटील म्हणाले.

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी ३८ मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी ४५ मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना २८ मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button