शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे : अजित पवार

मुंबई : शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्यसरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही वेडंवाकडं करा असं काही सांगत नाहीय. पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला… कास्तक-याला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक चौकशीचा सामना करावा लागत आहे. माध्यमांशी बोलताना याबाबत आपली भूमिका अजितदादांनी मांडली व या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी रीतसर एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. pic.twitter.com/xZYAZHCTgE
— NCP (@NCPspeaks) October 21, 2021
किरीट सोमय्यांना टोला
काही जण एवढी कागदपत्रे दाखवतात… अमुक तमुक… चौकशी करण्याचा अधिकार ज्या एजन्सीला आहे ती एजन्सी चौकशी करेल की नाही की दुसरं कुणी करेल असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना लगावला. पत्रकारांनी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याचा प्रश्न विचारला असता जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल. आरोप करणं हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्याचपध्दतीने ते आरोप करत आहेत.
त्यांनी केलेल्या आरोपात पुरावा बघितला जाईल. नुसता बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. याप्रकरणात अनेकांनी पूर्वीच्या सरकारमध्ये असताना चौकशी केलेली आहे. सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागाने एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी केलीय. यामध्ये एक – दोन कारखाने चालवायला दिले किंवा विकले गेलेले नाहीत तर त्याचा जवळपास आकडा ६०-७० पर्यत असू शकतो आणि त्यात सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित उद्योगपती, बिल्डर आहेत असेही अजित पवार म्हणाले.