Top Newsआरोग्यराजकारण

कोरोना प्रतिबंधक लसीचे १०० कोटी डोस हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिक : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : गुरुवारी भारतानं १०० कोटी करोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पार केला. देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात वेद वाक्यानं केली. आपल्या देशानं एकीकडे कर्तव्याचं पालन केलं आणि दुसरीकडे यशही मिळालं, असं मोदी यावेळी म्हणाले. गुरूवारी भारतानं १०० कोटी डोसचं कठीण लक्ष पार केलं. यामागे देशवासीयांचा पाठिंबाही होता. हे देशवासीयांचं, भारताचं यश आहे. १०० कोटी डोस हे केवळ एक आकडा नाही. हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब आहे. इतिहासाच्या नव्या अध्यायाची रचना आहे. कठिण ध्येयापर्यंत पोहोचणं जाणतो अशा भारताचं हे प्रतिबिंब आहे, असं मोदी देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले.

आज अनेक लोकं अन्य देशांशी या लसीकरणाची तुलना करत आहेत. जगातील अन्य देशांसाठी लसीवर रिचर्च करणं, ते शोधणं यात ते एक्सपर्ट होते. आपण अनेक लसी बाहेरून मागवत होतो. जेव्हा १०० वर्षांमधील मोठी महासाथ आली तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित करण्य़ात आले. भारत लसी कुठून आणणार, पैसे कसे उभारणा, महासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत आहे. आज भारतानं १०० कोटी डोस मोफत दिले आहे. आज जग भारताला कोरोनापासून भारताला सर्वात सुरक्षित मानेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आज जग भारताची ताकद पाहत आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

भारतानं इतिहास रचला आहे. आपण भारतीय विज्ञान, उद्योग आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार बनत आहोत. लसीकरणात १०० कोटींचा आकडा पार करण्यावर भारताला शुभेच्या. आपले डॉक्टर्स, नर्स आणि त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी हे ध्येय गाठण्यास मदत केली, असं म्हणत पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

कोविन अ‍ॅपचं कौतुक

आपण वेगानं लसीकरण करण्यासाठी एक यंत्रणा उभारली. कोविन अ‍ॅपचं आज जगभरातून कौतुक होत आहे. १०० कोटी डोस पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु भारतानं ते शक्य करून दाखवलं. भारतानं त्यासाठी एक यंत्रणा उभारली. लसीकरण मोहिमेदरम्यान भारतानं विज्ञानाची साथन सोडली नाही. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेला नवा उत्साह आला, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणताही भेदभाव न करता भारतानं विक्रमी लसीकरण करून दाखवलं. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोणतंही व्हीआयपी कल्चर शिरू दिलं नाही. यासर्वांमध्ये देशवासींचे प्रयत्न असल्याचंही मोदी म्हणाले.

टाळ्या अन् थाळ्या वाजवण्यावरून टोमणे मारणाऱ्यांचा समाचार

यावेळी लसीकरणावर आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाचार घेतला. भारत हा यापूर्वी अनेक लसी बाहेरून मागवत होता. जेव्हा १०० वर्षातली सर्वात मोठी महासाथ आली तेव्हा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. कोरोना महासाथीच्या सुरूवातीला भारत हा वैश्विक महासाथीचा कसा सामना करेल, भारत दुसऱ्या देशांकडून इतक्या लसी खरेदी करण्याचा पैसा कुठूण आणेल, भारताला लस केव्हा मिळणार, लस मिळल की नाही, महासाथ पसरण्यापासून थांबवता यावी यासाठी इतक्या प्रमाणात लसी भारत देऊ शकेल का?, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. हे १०० कोटी डोस आज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असल्याचंही ते म्हणाले.

भारत आणि भारताच्या लोकांसाठी असं सांगितलं जात होतं, इतका संयम इतकं अनुशासन इथे कसं चालेल. परंतु आमच्यासाठी लोकशाहीचा अर्थ सर्वांची साथ आहे. सर्वांसाठी मोफत लसीची मोहीम सुरू केली. जर आजार भेदभाव करत नाही, तर लसीतही भेदभाव होणार नाही. त्यामुळे व्हिआयपी कल्चर येऊ नये याची काळजी घेतली गेली. याठिकाणी लोक लस घेण्यास येणारच नाही असं म्हटलं जात होतं. अनेक देशात लसीची कमतरता आहे. पण भारताच्या लोकांनी १०० कोटी लसी घेऊन अशा लोकांना निरूत्तर केलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

देशाच्या या लढाईत जनतेच्या सहभाला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स बनवलं. लोकांनी एकजूट असण्याला ऊर्जा देण्यासाठी टाळ्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, त्यावेळी काही लोकांनी यामुळे महासाथ निघून जाईल का असा प्रश्न उपस्थित केला होता. सर्वांना त्यात देशाची एकता दिसली, सामूहिक शक्ती दिसली. या ताकदीनं कोविड लसीकरणात १०० कोटींपर्यंत पोहोचवलं आहे, असंही ते म्हणाले.

मेड इन इंडिया वस्तू खरेदी करण्याचे आवाहन

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोठे आवाहन केले आहे. या दिवाळीच्या सणाला शक्यतो मेड इन इंडिया, भारतातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे बाजारामधील खरेदी वाढत आहे. एक काळ असा होता जेव्हा बाजारात मेड इन हे, मेड इन ते या देशांच्या वस्तू दिसायच्या. मात्र आता प्रत्येक देशवासी मेड इन इंडियाची शक्ती अनुभवत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही वस्तूंच्या खरेदी करताना ती मेड इन इंडिया आहे का हे पाहून खरेदी करा. भारतातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य द्या, असं ते म्हणाले.

कोरोनाविरोधी युद्ध संपेपर्यंत ‘मास्क’ काढू नका

कोरोनाविरोधातील लढाईबाबत मोदींनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोरोनाविरोधात जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत मास्कसारखी शस्त्र वापरणे बंद करू नका, असे आवाहन मोदींनी केले आहे. काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना कोरोनाविरोधात सावध होण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश मोठे लक्ष्य समोर ठेवून ते गाठणे जाणतो. मात्र त्यासाठी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. त्याचं कारण म्हणजे कवच कितीही उत्तम असलं, आधुनिक असलं, पूर्ण सुरक्षेची हमी देणारं असलं, तरी जोवर युद्ध सुरू असतं, तोवर शस्त्रं खाली ठेवली जात नाहीत. त्यामुळे येणारे सण हे पूर्णपणे खबरदारी घेऊन साजरे करा.

आपल्याला जशी चपला घालूनच घराबाहेर पडण्याची सवय झालेली आहे. तशीच मास्कचीही सवय लावून घ्या. देशातील लसीकरणाने १०० कोटी डोसचा आकडा गाठला आहे. मात्र ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी मास्कला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी कोरोनाविरोधातील लस घेतली आहे, त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयत्न केल्यास कोरोनाला लवकर पराभूत करू शकू. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही येणारे सण पूर्ण खबरदारी घेऊन साजरे करा, असेही मोदींना आपल्या संबोधनामध्ये सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button