पेट्रोलने शंभरी पार करताच भाजपा मंत्र्याने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा सलग अकराव्या दिवशी इंधन दरवाढ करण्यात आली आहे. राजस्थानात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपयांपेक्षा अधिक झाला. तर मध्य प्रदेशातही शंभरी पार गेलं आहे. अधिक कर असलेले ब्रँडेड आणि उच्च दर्जाचे पेट्रोल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत याआधीच 100 रुपयांच्या वर गेले आहे. नियमित पेट्रोल मात्र प्रथमच शंभरी पार गेले आहे. याच दरम्यान पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर भाजपाच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री असणाऱ्या विश्वास सारंग यांनी वाढत्या इंधनदरांमुळे नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. तसेच यामागचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांनी सौरऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचे आभार मानायला हवेत असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. तसेच वाढत्या इंधनदरावरील कर कमी करून नागरिकांना ते उपलब्ध करता येऊ शकते का? असा सवाल विश्वास सारंग यांना करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. इंधन दराचे ‘अच्छे दिन’ संपले असून देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.
“मला पंतप्रधानांचे अभिनंदन करायचे आहे. वाहतुकीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबत तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी व्यवस्था तयार केली आहे. मोदींच्या इलेक्ट्रॉनिक वाहने आणण्याच्या निर्णयामुळे तेलाच्या किंमतीवरील आपले नियंत्रण अधिक मजबूत होईल. आंतराष्ट्रीय बाजारात मागणी आणि पुरवठ्यामुळे तेलाचे दर कमी होतात. अशा परिस्थितीत जर आपण मागणी कमी केली तर तेलाच्या किंमतींवर आपले नियंत्रण असेल म्हणूनच मोदींनी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यात आपण सक्षम बनू” असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे.