मुक्तपीठ

चारित्र्याचे चांगभले!

राजकारण हे सार्वजनिक जीवनाचे एक महत्त्वाचे अंग मानले जाते. या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की, राजकारणात काहीतरी मिळते म्हणून गर्दी असते आणि इतर क्षेत्रात आवडीप्रमाणे लोक जात असतात. राजकारण सट्ट्यासारखे चालते. कधी एक रुपया लावला तर त्याचे हजार रुपये मिळतात, समाजकारणात मात्र खिश्याला खार लागण्याची शक्यताच अधिक असते.
राजकारणाचे सगळे मार्ग थेट सत्तेकडे जाणारे असल्याने समाजाचे विविध वर्ग त्याकडे आकर्षित होतात. शिवाय राजकारण हा सध्याचा सर्वात सवंग लोकप्रियता मिळविण्याचा भाग बनले आहे. तुम्ही इतरांच्या तुलनेत थोडेसे चालू टाईप असलात की राजकारणात यश मिळण्याची शक्यता अधिक असते. *टोकाचा प्रामाणिक आणि साधाभोळा व्यक्ती यात अपयशी होतो, कारण राजकारण राजकारणासारखे करावे लागते. हा धूर्तपणा त्याचा आत्मसात नसतो म्हणून चालू व्यक्ती, शह-काटशह देणारा, प्रासंगिक निर्णय घेणारा, हजरजबाबी आणि काळाची गरज ओळखून भूमिका बदलणारा नेता झपाट्याने प्रगतीच्या दिशेने या क्षेत्रात वाटचाल करीत असतो*.
 अनेकदा आपण बघतो की, एखाद्या पक्षात वर्षानुवर्षे कार्यरत निष्ठावान एकाच जागेवर सडतात मात्र काही वर्षापूर्वी आलेले लोक कालसुसंगत वागत असल्याने यशाची शिखरे चढत जातात. या दोघांमध्ये काळाची हाक ज्याला ऐकू जाईल तोच पुढे जातो. ज्याला त्या ऐकू जात नाहीत किंवा ऐकल्यावर सुद्धा जो तिकडे कानाडोळा करतो त्याला जागेवरच वाळवी लागते आणि असे नेते एका क्षणी मार्गदर्शकाच्या भूमिकेत टाकले जातात किंवा प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात.
 जे यशाच्या पायर्‍या चढत जातात, त्यांना बौद्धिक आवाका असला तर अशा व्यक्ती राज्याचे नेतृत्व करायला सिद्ध होतात आणि जे सल्लागारांच्या बळावर काम करतात त्यांचे राजकारण एक दिवस संपुष्टात येते. क्षेत्र कोणतेही असो कमी अधिक प्रमाणात हेच सूत्र आजवर लागू होत आले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती रम, रमा आणि रमी या त्रिसूत्रीने आजवर अडचणीत आल्या आहेत. व्यसने आणि पैसा कुणाला नको असते. सध्याच्या राजकारण असलेला एकही व्यक्ती या दोघांच्या प्रभावातून मुक्त नाही, परंतु ज्यांनी या दोघांवर निमंत्रण ठेवले त्यांना आपण आपले ‘आपडॉल’ वगैरे मानत असतो. जो पकडला गेला तो अपराधी हे सूत्र या क्षेत्रालाही लागू होते. या दोघांपैकी पैसा हा अवगुण अलीकडे समाजाने एवढा स्वीकारला आहे की संधी मिळूनही कुणी तो कमवला नसेल तर पुढे लोक त्याला मूर्ख समजायला लागतात. *एखादा माजी आमदार ऑटोरिक्षातून जाताना दिसला की समाज त्याला अव्यवहारी आणि मूर्खात काढायला लागतो. एकदा तो आमदार झाला की पाच वर्षात किमान पुढच्या पाच पिढ्यांना पुरेल एवढा पैसा, संपत्ती त्याने गोळा करायला हवी, असे समाजानेच आता गृहीत धरलेले आहे.*
 त्यामुळे अलीकडे कुणी माजी आमदार रिक्षाने जाताना दिसत नाही. शासनाने सुद्धा 50 हजार महिना पेन्शनची त्याला सोय करून टाकली आहे. तरीही लोक दुसर्‍या अवगुणाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. चारित्र्य जपायला हवे असे वाटणारा मोठा वर्ग आजही राजकारणात कार्यरत आहे. दिवंगत आर. आर. पाटील त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. जनता दरबार असो की मंत्रालयातील कक्ष, कोणत्याही महिलेला विशिष्ट अंतरावरून ऐकणारे आर. आर. आबा आता दुर्मिळ झाले आहेत. आवडलेल्या आणि एकदम डोक्यात गेलेल्या स्त्रियांना स्वतंत्र वेळ देणार्‍या मंत्री, आमदार आणि नेत्यांची मोठी जमात गेल्या काही वर्षात निर्माण झाली आहे.
*मंत्रालयात ग्रामीण भागातून आलेल्या मंत्र्यांना सौंदर्याची भुरळ पाडून त्यांच्याकडून कामाच्या फायली क्लीअर करणार्‍या ललनांचा मुंबईत सुळसुळाट आहे. कोट्यवधींच्या फायली मंत्र्यांकडे अडकलेले मोठे बिल्डर तर सर्रास टीव्ही मालिकांमधील नट्यांना कामाच्या फायली घेऊन मंत्र्यांकडे पाठवत असतात. हुशार मंत्री हा डाव ओळखतात, अधाशी मात्र फायलींवर सह्या करून मोकळे होतात असा हा मामला आहे. *पकडला गेला तर चारित्र्यहीन अन्यथा हाच पठ्ठ्या, त्याच्या समूहासाठी मसिहा वगैरे असतो*. काहीतरी द्यावे लागते ही
कॉर्पोरेट संस्कृती झपाट्याने राजमान्य होत असताना चारित्र्याचे चांगभले कुणाला हवे आहे?
– पुरुषोत्तम आवारे-पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button